
लहान मुला/मुलींवर झालेल्या अत्याचाराची सुनावणी विशेष पोक्सो न्यायाधीशांनी कशी संवेदनशीलपणे घ्यावी, याचे सविस्तर आदेश आम्ही देऊ, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अल्पवयीन पीडितांना न्याय देण्याची सर्वस्वी जबाबदारी विशेष सरकारी वकिलांची आहे, असेही न्यायालयाने बजावले आहे.
नाशिक येथे 10 वर्षांच्या मुलीवर 64 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला. 2018मध्ये ही घटना घडली. त्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष पोक्सो न्यायालयाने पीडितेच्या जबाबावर संशय व्यक्त केला. विशेष न्यायालयाने आरोपीला अवघ्या तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा रद्द करण्यासाठी आरोपी रोडू वाघने उच्च न्यायालयात याचिका केली होती.
त्यावरील सुनावणीत न्या. भारती डांगरे यांनी संताप व्यक्त केला. कायद्यात अधिक शिक्षा देण्याची तरतूद असताना विशेष न्यायाधीशांनी आरोपीला कमी शिक्षा ठोठावली, असा ठपका न्यायालयाने ठेवला. आरोपीची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. आरोपीला कमी शिक्षा ठोठावत असताना विशेष सरकारी वकिलानेही कायद्यातील तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या नाहीत. या शिक्षेचे अपील करतानाही यासाठी शिफारस केली नाही, असे न्यायालयाने फटकारले.
पीडित लहान मुलांना न्याय मिळावा म्हणून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाते. विशेष सरकारी वकिलाने कायद्यातील तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणायला हव्यात. या सर्व गोष्टी उच्च न्यायालयातील सरकारी वकिलाने विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवाच्या निदर्शनास आणाव्यात. विशेष सरकारी वकिलांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी काय केले जाईल याची माहिती विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्रावर सादर करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कमी शिक्षा देण्याचा अधिकार सुनावणी न्यायालयाला नाही
पोक्सो कायदा कलम-4 अंतर्गत आरोपीला सात वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आहे. कलम-6 अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आहे. जिथे जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे, तेथे तीन वर्षांची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.























































