
जेडी(एस) चे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी (HD Kumaraswamy) यांची तब्येत शनिवारी सायंकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात (Manipal Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुमारस्वामी यांची तब्येत बिघडल्याने कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत.
कर्नाटकामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 10 मे रोजी येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एचडी कुमारस्वामी सातत्याने राज्यभर दौरे करत आहेत. याच दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्यांने त्यांना तातडीने बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुमारस्वामी यांच्यावर याआधी ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्यामुळे अचानक त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने कार्यकर्ते चिंतेत पडले. मात्र कुमारस्वामी यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत कार्यकर्त्यांना काळजी न करण्याची विनंती केली असून ते विश्रांतीनंतर निवडणूक प्रचारात सहभागी होतील, असे म्हटले आहे.
Karnataka | JD(S) leader HD Kumaraswamy admitted to a private hospital after he complained of fever: Office of HD Kumaraswamy
(file pic) pic.twitter.com/KJBgb15UkG
— ANI (@ANI) April 22, 2023
दरम्यान, मणिपाल हॉस्पिटलने एक निवेदन जारी करत कुमारस्वामी यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. एचडी कुमारस्वामी यांना 22 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सत्यनाराणय म्हैसूर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना थकवा आणि अशक्तपणा आला असून यासंबंधी सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. ते सध्या ठीक असून ते निरोगी असल्याचे रुग्णालयाने निवेदनात म्हटले आहे.





























































