सूर्यकुमारच्या फॉर्मची चिंता… छे कधीच नाही! प्रशिक्षक गंभीर टी-20 कर्णधाराच्या पाठीशी

हिंदुस्थानचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत सर्व शंका दूर करत त्याची ठामपणे पाठराखण केली आहे. सूर्यकुमारच्या फलंदाजीच्या फॉर्मबद्दल मला अजिबात चिंता नाही. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि जेव्हा तुम्ही अशी मानसिकता ठेवता तेव्हा अपयश ही त्या प्रवासाचा भाग असते, असे गंभीरने स्पष्ट केले.

एका क्रीडा वाहिनीवरील मुलाखतीत तो म्हणाला, सूर्यकुमारला सध्या थोडा संघर्ष करावा लागत असला तरी अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा जोरदार फॉर्ममध्ये आहेत. माझं लक्ष एखाद्या खेळाडूकडे नसून संपूर्ण संघाच्या सामूहिक कामगिरीवर आहे. अभिषेक उत्तम खेळतोय, पण सूर्याला त्याची लय सापडली की तो संघाची जबाबदारी स्वतःहून घेईल.

गंभीरने पुढे सांगितलं, टी-20 क्रिकेटमध्ये वैयक्तिक धावसंख्या महत्त्वाची नसते, तर संघ कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आक्रमक शैलीत खेळताना अपयश येऊ शकतं, पण शेवटी धावांपेक्षा खेळातील प्रभावच खरी किंमत ठरवतो. सूर्यकुमार सध्या टी-20 संघातील मध्यवर्ती भूमिका निभावत असून, गंभीरच्या या वक्तव्याने त्याच्यावरचा दबाव काही प्रमाणात कमी झाल्याचं मानलं जात आहे.