शिवसेनेद्वारे आयोजित हृदयरोग तपासणी, उपचार शिबीराला प्रचंड प्रतिसाद

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजकारणाचे धडे दिले. त्यामुळेच आम्ही गरजूंसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करुन डॉक्टर तसेच गरीब रुग्णांच्यामधील दुवा बनण्याचा प्रयत्न करीत असतो. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानतो, असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी केले. ते यवतमाळ येथे शिवसेनेतर्फे आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.) तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळमध्ये भव्य मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे राज्याचे वनमंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ही रुग्णसेवा अशीच सुरु ठेवणार असल्याची ग्वाही राठोड यांनी दिली.

या शिबीराकरीता जिल्ह्यातून जवळपास एक हजार रुग्णांनी नोंदणी केली आहे. गरजू रुग्णांची मोफत अँजीओग्राफी, अँजिओप्लॅस्टि आणि बायपास शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. दुपारपर्यंत शिबिरात 375 रुग्णाची तपासणी झाली होती. त्यातील 123 रुग्णांना अँजीओग्राफी करण्यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे तारीख दिल्या जाणार आहे. आवश्यकता असल्यास त्या रुग्णांची मोफत अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रीया शिवसेनेच्या पुढाकारात मोफत करण्यात येणार आहे. इतर रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या