
दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या वाढत असल्याचे दिसून येते. विशेषतः तरुणवर्गाला या समस्येने ग्रासले आहे. लॉकडाऊन कालावधीतही बैठी जीवनशैली, वर्क फ्रॉम होम, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव यामुळे या समस्येत आणखी वाढ झाल्याचे दिसून आले. लठ्ठपणाकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुणींमध्ये पीसीओएससारखी हार्मोनल समस्या उद्भवत आहे. यात त्यांच्या शरीरात पुरुष हार्मोन्सची पातळी वाढते. भविष्यात या लठ्ठपणामुळे गर्भाशयाची यंत्रणादेखील बिघडते. परिणामी बीजधारणेवरही विपरीत परिणाम होतो.
तरुण वयातील सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारी समस्या म्हणजे पीसीओएस. यामुळे गर्भधारणेवर परिणाम होतो. परिणामी भविष्यात वंधत्वासारख्या समस्येलाही तोंड द्यावे लागू शकते. प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱया मुख्य कारणापैकी एक म्हणजे लठ्ठपणा. जीवनशैलीत झालेल्या चुकीच्या बदलांमुळे प्रजननाच्या वयोगटातील तरुणींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे बीज फलनाची शक्यता कमी होते. त्यामुळे लठ्ठ स्त्रियांना गर्भधारणा होत नसल्यास अतिरिक्त वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
लठ्ठपणामुळे शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावरही परिणाम होतो. शरीरातील वाढत्या चरबीमुळे महिलेच्या बीजांडकोषात स्त्र्ााr बीज तयार होत असले तरीदेखील ते बीज फुटत नाही आणि त्यामुळे मासिक पाळीदेखील येत नाही. अशा स्थितीत ओव्हरीमध्ये छोटय़ा-छोटय़ा सिस्ट (गाठी) तयार होतात. अशावेळी महिलेला गर्भधारण करण्यास अडचणी येतात. यामुळे काही महिलांमध्ये वंधत्वाची समस्याही निर्माण होते. शरीराचे वजन आणि अतिरिक्त चरबी किंवा मेद वितरण या गोष्टींचा परिणाम हा स्त्रियांच्या गर्भधारणेवर होत असतो.
योग्य बीएमआय राखणे आवश्यक
लठ्ठपणा शरीरामध्ये निर्माण झालेला आहे की नाही यासाठी काही मापक पद्धती वापरली जाते आणि आपल्या शरीरातील बीएमआयच्या माध्यमातून अतिलठ्ठपणाचे मोजमाप केले जाते.
योग्य बीएमआय राखा
आपल्या शरीरातील बीएमआय तपासणी केली तर यामुळे आपल्या शरीरातील अतिलठ्ठपणा नेमक्या कोणत्या पातळीवर आहे, त्याचा स्तर काय आहे याबद्दलची अचूक माहिती आपल्याला कळू शकते त्यानुसार वजन कमी करता येणे शक्य होईल. वजन कमी झाल्यास लठ्ठपणामुळे उद्भवणाऱया अनेक आजारांवर सामना करावा लागत नाही. लठ्ठपणावर मात करण्याच्या काही प्रभावी उपायांपैकी एक म्हणजे बॅरिऑट्रिक सर्जरी, बॉडी मास इंडेक्सची मात्रा 35 पेक्षा जास्त असल्यास बॅरिऑट्रिक सर्जरी करून सल्ला दिला जातो.
पीसीओएसची लक्षणे: 1) मासिक पाळीतील अनियमितता 2) पिंपल्सची समस्या 3) शरीरावरील केसांची वाढ, अनावश्यक जागी येणारे केस 4) वंध्यत्वाची समस्या 5) केस गळणे
लठ्ठपणाचे गर्भावस्थेतील गुंतागुंती:
- अकाली प्रसूती
- सिझेरियन प्रसूतीच्या शक्यता वाढणे
- मॅक्रोसोमिया (गर्भ लांब असणे)
- जन्मजात व्यंग स्टील बर्थ
पीसीओएसग्रस्त व्यक्तीचे वजन कमी होणे हे सर्वसामान्यांपेक्षा कठीण ठरत असून अनेकदा तज्ञांच्या मदतीने आवश्यकता भासू शकते.
डॉ. मनीष मोटवानी,
बॅरिऑट्रिक सर्जन – आस्था बॅरिऑट्रिक्स – सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेटाबॉलिक अॅण्ड बॅरिऑट्रिक सर्जरी, मुलुंड





























































