मुद्दा – आरोग्याच्या समस्या आणि पर्यावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदूषण, हवामान बदल, ग्लोबल वार्मिंग आणि ओझोन थर कमी होणे यासारख्या पर्यावरणीय घटकांचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची काळाची गरज आहे. झेन मल्टिस्पेशालिटी जनरल फिजिशियन आणि संसर्गजन्य रोगतज्ञ डॉ. विक्रांत शहा म्हणाले की, रुग्णालयाचे आपले आरोग्य हे थेट पर्यावरणाशी निगडित आहे. स्वच्छ शहर आणि हिरवेगार वातावरण हे निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते, हवामान बदलामुळे 2030 आणि 2050 मध्ये कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि वाढत्या उष्णतेमुळे दरवर्षी अंदाजे अडीच लाख अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. हवामान आणि संबंधित पर्यावरणीय आपत्तींमुळे जगाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उष्ण तापमानामुळे ओझोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ग्लोबल वार्मिंग होते आणि त्यामुळे एखाद्याच्या फुप्फुसाच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते. दम्याचे रुग्ण आणि फुप्फुसाचे आजार असलेल्यांमध्ये गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील इंटर्नल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. तुषार राणे म्हणाले की, पर्यावरणातील घटकांचा तुमच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. विविध रोगांमागील पर्यावरणीय जोखीम घटक म्हणजे प्रदूषण, हवेतील सूक्ष्म जंतू, पाणी किंवा अन्नातील मातीचे दूषित घटक, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ, भूकंप, पूर) आणि कीटकनाशके व इतर रसायनांचा वापर या घटकांचा परिणाम आरोग्यावर होतो. वायुप्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती, सूक्ष्म जंतूंमुळे होणारे रोग आणि  पाण्याची गुणवत्ता ही घातक आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते. पर्यावरणीय प्रदूषक आणि औद्योगिक कचरा यामुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), ब्राँकायटिस, हृदयरोग (अनियमित हृदयाचे ठोके, हृदय अपयश), नैराश्य, स्ट्रोक, घरघर, खोकला आणि दम लागणे यांसारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. अलीकडच्या वर्षात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्याही वाढतात. असुरक्षित पिण्याचे पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, कॉलरा, मेंदुज्वर आणि जठराला सूज येते.

डॉ. राणे पुढे म्हणाले की, पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील आणि बाहेरील प्रदूषण टाळून, निसर्गाची काळजी घेऊन, पाण्याची बचत करून, हानीकारक वायूंचे उत्सर्जन नियंत्रित करून आणि ग्रह व तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करून वायुप्रदूषण कमी करा. लोकांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी निरोगी वातावरण राखणे आवश्यक आहे.