Tips – बिछान्यावर पडल्या पडल्या शांत झोप हवीय? मग ‘या’ 7 गोष्टी नक्की वाचा

निरोगी आयुष्यासाठी वेळेत आणि पुरेशी झोप आवश्यक असते. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे पुरेशी झोप मिळत नाही. याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड वाढते आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

झोप पुरेशी न झाल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. जगभरात झालेल्या विविध संशोधनांनुसार झोप पुरेशी न घेतल्यामुळे हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बिछान्यावर पडल्या पडल्या शांत झोप लागण्यासाठी पुढील 7 गोष्टी नक्की वाचा….

1. वेळेवर झोपा

झोपेची आदर्श वेळ नक्की काय याबाबत मतभेद आहेत. मात्र रोज जाणीवपूर्वक एकाच वेळी झोपा आणि ती वेळ पाळण्याचा प्रयत्न करा. हे कठीण असले तरी प्रयत्न केल्यास सर्व शक्य आहे. झोप पूर्ण झाल्यावर सकाळी ताजेतवाणे वाटेल आणि दिवसही चांगला जाईल.

2. खोलीतील वातावरण थंड ठेवा

झोपताना खोलीतील तापमान थोडे थंड असावे असे काही तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे शांत झोप लागू शकते. मात्र ऋतुमानानुसार खोलीतील वातावरण ठेवणे अधिक चांगले.

3. झोपण्याआधी अंघोळ करा

झोपण्याआधी अंघोळ केल्यास शांत झोप लागते असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीर रिलॅक्स होते आणि थकवा जाऊन निवांत झोपही लागेल.

Tips – वेळीच व्हा सावध, ‘या’ 5 चुकीच्या सवयींमुळे येऊ शकते अकाली वृद्धत्व

4. मद्यपान टाळा

चांगली झोप लागण्यासाठी मद्यपान टाळणे गरजेचे आहे. मद्यपानामुळे शरीराचे चक्र बदलते. सुरुवातीला गाढ झोप लागली तरी नंतर अस्वस्थ वाटून झोप चाळवली जाऊ शकते आणि यामुळे शरीराचे गणितही बिघडू शकते.

5. नियमित व्यायम करा

आजकाल कॉर्पोरेट जगात अनेक जण कॉम्यूटरसमोर बसून काम करतात. बैठे काम असल्याने व्यायाम कमी होतो आणि स्थुलपणा येतो. म्हणून नियमित व्यायाम करा. यामुळे बिछान्यावर पडल्या पडल्या झोप लागेल.

6. हलका आहार

रात्री झोपताना शक्यतो हलका आहार घेणे कधीही चांगले. यामुळे पचनसंस्थेवर ताण येणार नाही. तसेच झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवण घ्या आणि शतपावली करा. यामुळे शांत झोप लागेल.

7. योग्य स्थितीत झोपा

अनेकदा आपण झोपताना वाकडे तिकडे झोपतो आणि रात्री कळ लागल्यावर कुस बदलतो. यामुळे झोप चाळवली जाते. तसेच पाठीवर न झोपता एका कुशीवर झोपलेले कधीही चांगले, यामुळे पाठीवर ताण येत नाही आणि शांत झोप लागते व पाठदुखीचा त्रासही होत नाही.

Tips – घरच्या घरी असा बनवा आयुर्वेदिक काढा अन रोग प्रतिकारशक्ती वाढवा

आपली प्रतिक्रिया द्या