
आपल्या रोजच्या सवयींचा आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायमाचा अभाव, जंक फूडचे अति सेवन आणि कमी झोप यामुळे तर आरोग्य खूपच बिघडण्याची शक्यता असते. तसेच काही चुकीच्या सवयींचा चेहरा, त्वचा यावर प्रभाव पडतो आणि वेळेआधीच वृद्ध दिसू लागतो. आज आपण अशाच काही सवयींबाबत माहिती घेणार आहोत. त्यामुळे सावध व्हा आणि वेळीच या सवयी बदला.
स्ट्रॉचा वापर –

बहुतांश वेळी आपण बाहेर शितपेयं, ज्यूस किंवा अन्य लिक्विड गोष्टी पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर करतो. परंतु स्ट्रॉने पिताना आपल्या ओठाच्या चारही बाजू खेचल्या जातात. यामुळे चेहऱ्यावर अकाली झुऱ्या पडतात. त्यामुळे कप किंवा ग्लासने शितपेयं किंवा ज्यूस पिण्याचा प्रयत्न करा.
जंक फूड आणि शितपेयं –

हल्ली धावपळीच्या जीवनात जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक (शितपेयं) खाण्या-पिण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय. जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रांस फॅट, साखर आणि मीठ असते. यात पौष्टिक घटक अत्यल्प प्रमाणात असतात. याच्या सेवनामुळे शरीरातील कोलेजन (Collagen) चे प्रमाण कमी होते. आपल्या शरीरातील कोलेजन हे चेहऱ्यावर झुऱ्या येण्यास रोखतात, मात्र जंक फूडच्या सेवनाने कोलेजनचे प्रमाण कमी होत असल्याने अकाली वृद्ध दिसण्याची शक्यता वाढते.
दारूचे सेवन –

एका अभ्यासानुसार जी लोकं दारूचे सातत्याने सेवन करतात ते अकाली वृद्ध दिसण्याची शक्यता जास्त असते. दारूच्या सेवनाने डोळ्याखाली काळे डाग किंवा सर्कल तयार होतात, तसेच चेहऱ्यावर झुऱ्याही येतात व डिहायड्रेशनही होते.
पोटावर झोपणे –

झोपल्याने आराम मिळतो आणि आपले शरीर रिकव्हर होते. मात्र अनेकांना पोटावर झोपण्याचे (पालथे झोपणे) सवय असते, मात्र या सवीयमुळे तुम्ही अकाली वृद्ध दिसू शकता. ‘अॅस्थेटिक सर्जरी’ जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या एका केस स्टडीनुसार, पोटावर झोपल्याने चेहऱ्यावर दबाव निर्माण होतो आणि चेहऱ्यावर झुऱ्या तयार होऊ लागतात. त्यामुळे पाठीवर किंवा एका अंगावर झोपणे कधीही चांगले.
पूर्ण झोप न होणे –

बऱ्याच जणांना रात्री उशिरापर्यंत जाणण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय असते. मात्र झोप पूर्ण न झाल्यास चेहऱ्यावर झुऱ्या तयार होऊ शकतात. झोप पूर्ण न झाल्याने आपले रोजचे रुटीन बिघडते. याचा थेट प्रभाव शरीरावर पडतो. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल केस मेडिकल सेंटरच्या स्टडीनुसार, पूर्ण झोप न घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जास्त झुऱ्या दिसून येतात. यामागे ताण-तणाव हे कारणही दिसून आले आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.




























































