आरोग्यसेविकेला न्याय न मिळाल्यास काम बंद आंदोलन, आरोग्य कर्मचारी संघटनेचा इशारा; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आरोग्य कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी समाजाच्या सेवेसाठी काम करत असताना त्यांच्यावर होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलन छेडतील असा इशारा निवेंडकर यांनी दिला आहे..

या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याची प्रत जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक यांना ही देण्यात आली आहे.