
मुंबई, ठाणे, पालघर, अलिबागसह संपूर्ण कोकण पट्टय़ात उष्णतेच्या लाटेची धग सुरू झाली आहे. गेले काही दिवस सरासरीच्या पातळीवर राहिलेला मुंबई-ठाण्याचा पारा गुरुवारी थेट 39 अंशांवर उसळला, तर अलिबागमध्ये 35.2 अंश आणि डहाणूत 36.7 अंश तापमानाची नोंद झाली. याचवेळी थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेराननेही 37 अंशांची होरपळ सोसली.
मार्चमध्ये उष्णतेची लाट धडकल्यानंतर मुंबईचे तापमान सरासरीच्या पातळीवर होते. गुरुवारी अचानक वातावरणात मोठा बदल झाला. मुंबई-ठाण्यासह संपूर्ण कोकण पट्टय़ात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून आला. वेस्टर्न डिस्टर्बन्स पुढे सरकल्यामुळे आकाश निरभ्र झाले. यादरम्यान उत्तरेकडून वारे वाहू लागले. ते वारे कोरडे होते. त्यांनी समुद्राकडून येणारी हवा रोखून धरली. परिणामी, तापमानात एकाकी मोठी वाढ झाली, असे कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार गुरुवारी सांताक्रुझमध्ये 38.9 आणि कुलाब्यात 37.2 अंश तापमान होते. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे सरासरीपेक्षा
6 आणि 4 अंशांची वाढ झाली.
मुंबईत पावसाची रिपरिप; दोन दिवसांत मुसळधार
उन्हाचे चटके दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच आज मुंबईत पावसाचा शिडकावा झाला. दक्षिण मुंबईत सकाळी पावसाने काही वेळ हजेरी लावली. नवी मुंबईच्या काही भागांमध्येही बुधवारी सायंकाळपासून अधूनमधून पावसाची रिपरिप होत आहे. मुंबईकरांना भरउन्हाळय़ात येत्या दोन दिवसांत पावसाची मुसळधार अनुभवायला मिळू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईतील काही भाग, नवी मुंबई आणि सातारा येथे आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.































































