
सामना ऑनलाईन, नाशिक
उन्हाचा वाढता तडाखा वन्यप्राण्यांच्या जीवावरही बेतला आहे. चांदवड तालुक्यातील दहिवद व दिघवड या गावांमध्ये उष्माघातासह अन्य कारणांमुळे गेल्या दोन आठवडय़ात सुमारे चाळीस मोर दगावले आहेत. मात्र, वन विभागाने नऊ मोरांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. उष्माघातामुळे अशक्तपणा येवून उडता येत नसल्याने काही कुत्र्याच्या हल्ल्यात, तर काही विहिरीत पडून मृत्युमुखी पडले आहेत.
राज्यात एप्रिलपासून उष्णतेची तीव्रता वाढली आहे. 40 ते 42 अंशांच्या दरम्यान कमाल तापमानाचा पारा पोहचल्याने होरपळल्यागत स्थिती झाली आहे. उष्माघात माणसांसोबतच वन्यजीवांच्या जीवावर बेतला आहे. चांदवड तालुक्यातील चांदवड-लासलगाव रस्त्यावर दहिवद व दिघवड या शेजारी-शेजारी असलेल्या दोन गावांमध्ये मोरांची संख्या सुमारे दीडशे ते दोनशेच्या घरात आहे. येथील एक किलोमीटर चौरस परिसरात 27 एप्रिल ते आज 9 मे या कालावधीत 40 ते 50 मोर दगावले, असे ग्रामस्थांनी सांगितले. उष्माघातामुळे अशक्तपणा आल्याने उडणे अशक्य झालेले काही मोर कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होवून मृत्युमुखी पडले, काही विहिरीत पडून दगावले.
वन विभागाकडे नऊ मृत्यूंची नोंद
मृत्युमुखी पडलेल्या मोरांची संख्या नऊ असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास तातपूरकर यांनी सांगितले. नऊपैकी दोन ते तीन उष्माघाताने, तर इतर कुत्र्याच्या हल्ल्यात, विहिरीत पडून मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचा व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, येत्या दोन-तीन दिवसात अहवाल प्राप्त होताच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल, असे त्यांनी सांगितले.
76 कुंडय़ांद्वारे पाण्याची सुविधा
दहिवद व दिघवड भागात 28 एप्रिलपासून आजतागायत 8 सिमेंटच्या कुंडय़ा, 13 मातीच्या, तर 55 प्लॅस्टिकच्या कुंडय़ांद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाद्य म्हणून मक्याचा भरडा या मोरांसाठी ठेवला आहे.चांदवड तालुक्यातील भडाणे, रायपूर, लासलगाव, हिवरखेडे, मेसणखेडा, दहिवद, दिघवड, दुगाव या भागात एक हजाराहून जास्त मोर बघावयास मिळतात.
कळवणमध्ये तीन, येवल्यात एक मृत्यू
कळवण तालुक्यातही मोर आढळतात. एप्रिलअखेरीस प्रचंड उष्म्यामुळे बैज, दह्याणे, खेडगाव येथे प्रत्येकी एका मोराचा मृत्यू झाला, तर अभोण्यात उष्माघाताचा एका मोराला त्रास झाला होता, मात्र वेळीच उपचार झाल्याने त्याला वाचविण्यात यश आले आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव येथे एप्रिल महिन्यात उष्माघाताने एका मोराचा बळी गेला.
नागपुरात तिघांचा मृत्यू
नागपूरचा पार 44.6 अंश सेल्सियसवर पोहोचला असताना उष्णतेच्या लाटेमुळे वैशाखाचा वणवा पेटला आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. यामुळे गेल्या 24 तासात 3 पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या 3 वेगवेगळ्या घटनांत तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वडधामना वाडी देशमुख ले-आउट पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीजवळ सांडपाण्याच्या थळीवर एक इसम 8 मे रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृतकाचे नाव सुभाष रामभाऊ गणविर (40) आहे.
एमआयडीसी नागपूर येथील रहिवासी प्रविण प्रमोद साठवणे (37) हा 8 मे रोजी सायंकाळी 6.25 वाजताच्या दरम्यान प्रतापनगर हद्दीतील अरिहंत एंटरप्रायजेस दुकानात गिफ्ट घेण्याकरिता गेला होता. त्याला अचानक भोवळ आली आणि तो खाली पडला.
न्यू लूक कॉन्व्हेंट येथील रहिवासी सतिश किसनराव गेडाम (45) हे 9 मे रोजी मध्यरात्री दीडच्या पूर्वी भारत पेट्रोलपंपाजवळ मृतावस्थेत आढळले.






























































