नगर तालुक्यातील अतिवृष्टी बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करावे, महाविकास आघाडीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, माजी सभापती बाळासाहेब हराळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, माजी सभापती प्रवीण कोकाटे संदीप कोकाटे आधी उपस्थित होते.

नगर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात सडत आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, तूर, कापूस, उडीद, बाजरी, कांदा आदींसह इतरही आणखी पिके पाण्यात गेली आहेत. तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. बऱ्याचशा घरांची पडझड झालेली आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर आलेले आहेत.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, वाळकी, जेऊर, निंबाळक, चास, देहरे, नालेगाव, कापूरवाडी या महसूल मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्या-त्या ठिकाणची पाहणी करून सरसकट पिकांचे पंचनामे करण्यात यावे. चिचोंडी पाटील परिसरामध्ये 14 ऑक्टोबरला 85 मिलिमीटर तर 16 ऑक्टोबरला 77 मिलिमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. शासन दरबारी 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस एका दिवसात झाला तर त्यास अतिवृष्टी असे संबोधले जाते. त्यामुळे आपण वरील बाबींची दखल घेऊन सरसकट पिकांचे पंचनामे तातडीने करावेत व बाधित शेतकल्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल. असे निवेदनामध्ये म्हणले आहे