पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील दोन दिवस राज्यभरात मुसळधार पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून एखादी सर आणि कडक ऊन अशा विचित्र हवामानाचा सामना मुंबईकर आहेत. मात्र पुढील दोन दिवस मुंबई गारेगार होणार असून मुंबईकरांची उकाडय़ापासून सुटका होणार आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. उद्या गौरी-गणपती विसर्जनावेळी पावसाचा जोर मोठा असण्याची शक्यता आहे.

कोकणासह, पुणे, कोल्हापूर, साताऱयातही पावसाचा जोर

पुढील दोन दिवस दक्षिण कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर राहू शकतो. पठारी भागात मध्यम सरींचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ातही छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.