
मुंबईसह कोकणात दमदार सुरुवात करणाऱया पावसाने मुंबईत गेले तीन दिवस ओढ दिली असली तरी येत्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे, मात्र मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रत्नागिरी आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, मात्र सिंधुदुर्गमध्ये गुरुवारपासून रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत तर कोल्हापूर आणि साताऱयात गुरुवारी मध्यम तर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात आजपासून चार दिवस कोसळधार
कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली असली तरी विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. विदर्भात उद्यापासून चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस पडेल. गुरुवार, 13 जुलैपासून रविवार, 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



























































