
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात वादळाने कहर केला आहे. तालुक्यातीत पंधरा वाड्या-वस्त्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. यात ३४६ घरांचे नुकसान झाले असून, दहा माणसं जखमी झाली आहेत, तर पाच जनांवरांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे घरांचे पत्रे उडून गेले तसेच पॉलीहाऊस, फळबागा, पोल्ट्रीफार्मला याचा फटका बसला असून यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यात आढळगाव, काष्टी, चांडगाव आणि गारसह पंधरा वाड्या वस्त्यांना वादळाचा फटका बसला आहे. घराचं पत्रे उडून आणि भिंती पडून नुकसान झाले आहे. यात दहा जण जखमी झालेत. तर दोन गायी, दोन शेळ्या आणि एक रेडकू ठार झाल आहे. वादळामध्ये पोल्ट्री फार्मचं शेड आणि पॉलीहाऊसही जमीनदोस्त झालं आहे. वादळाने डाळिंब आणि लिंबाच्या फळबाग उन्मळून पडली. डाळिंबानं लगडलेली झाडं आणि लिंबाच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा सुरु असून करोडो रुपयांचा चक्काचूर झाल्याची शक्यता आहे.
नुकसानग्रस्त घरं
काष्टीत ८०, गारला ४०, सांगवीला ३५, चांडगावला ६० आणि मुंढेकरवाडी २० घराचं नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कणसेवाडीत १४, चिखलठणवाडी १६ आणि अजनुजमध्ये ३१ तर आनंदवाडी ३२ घरांचे पत्रे उडाले. घरांचे पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अन्नधान्याची माती झाली असून जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेवणापासून राहण्याची नागरिकांची गैरसोय झाली आहे.























































