
रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 95.17 मिमी पाऊस पडला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
चिपळूण तालुक्यातील मौजे पिंपळी बुद्रुक येथील संदीप बावडेकर यांच्या घराचे, मौजे खालाचा पिंपळी येथील कादिर मिरारवान यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. गुहागर येथील मौजे चिखली-पागरी येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्याचे काम सुरु केले आहे. मौजे अंजनवेल-काजुर्ले रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळल्याने गटारे बंद झाली आहेत. या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरु आहे.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे धामापूर येथील लक्ष्मण रोमाणे यांच्या गोठ्याचे 32 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे शिव धामापूर येथे रामदास चव्हाण यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील मौजे हरळ येथे विठोबा गंगाराम पांचाळ यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे़. कोठेही जिवीतहानी झालेली नाही़.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 95.17 मिमी तर एकूण 856.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात मंडणगडमध्ये 111 मिमी, दापोलीत 87.40 मिमी, खेडमध्ये 114.40 मिमी, गुहागरमध्ये 137.40 मिमी, चिपळूणमध्ये 95.50 मिमी, संगमेश्वरमध्ये 108.80 मिमी, रत्नागिरीत 74.70 मिमी, राजापूरमध्ये 65 मिमी तर लांजामध्ये 63.30 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.





























































