गोव्यात चौथ्या दिवशी मुसळधार कायम, दिवाडीत वादळी वाऱ्याने मोठी पडझड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पणजी

राज्यभरात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवाडी बेटावर वारा व पावसामुळे पडझडीचे प्रकार घडले. रविवारीदेखील पावसाचा जोर कायम राहणार, अशी शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.

पणजीत शनिवारी दिवसभर पावसाचा ओघ कायम होता. पणजीत 136.9 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. पणजीत भाटले व कुडका येथे घरावर झाड पडले. भाटले येथे घरावर पडलेले झाड अग्निशमन दलाच्या जवानांनी काढल्याने नुकसान झाले नाही. कुडका येथेही घरावर पडलेले झाड जवानांच्या मदतीने काढण्यात आले व फारसे नुकसान झाले नाही. तसेच ताळगाव येथे इनोव्हा गाडीवर झाड पडल्याने 10 हजारांचे नुकसान झाले. नेरूल येथेही झाड विजेच्या तारेवर पडल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार घडले. पणजीत दिवसभर पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते.

दिवाडी येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पडझड झाली. दिवाडी येथे विजेचे खांब कोसळल्याने वीज गुल होती. तसेच काही घरांची छप्परेही उडून गेली. मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्यांची पडझडही झाली.त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पावसाने शनिवारी विविध भागात जोरदार हजेरी लावली. गेल्या 24 तासांत एला (जुने गोवे) येथे सर्वाधिक 147.8 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. केपे येथे पावसाचे प्रमाण कमी होते. केपेत सर्वात कमी 80.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. पुढील तीन दिवस पावसाचा जोर काही ठिकाणी कमी असेल, अशी माहिती वेधशाळेने दिली.

राज्यात गेल्या 24 तासांत काणकोण येथे 131.2 मि.मी., पेडण्यात 113.8 मि.मी., वाळपईत 104.9 मि.मी., साखळी येथे 100.8 मि.मी., म्हापसा येथे 110.2 मि.मी., फोंडा येथे 84.4 मि.मी., दाबोळी येथे 105 मि.मी., मडगाव येथे 107 मि.मी., मुरगाव येथे 100.4 व सांगे येथे 104.3 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. 1 जून ते 29 जून दरम्यान दाबोळी येथे सर्वाधिक 849.1 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.