
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत पावसाचा काहीच भरोसा नसतो राव. कधी मत्त होतो, तर कधी मल्ल्यासारखा गायब होतो. मुंबई शहर-उपनगरात मात्र आज सकाळीच पाऊस अवतीर्ण झाला आणि मुंबईकरांचा वीक एण्ड चिंब झाला. दिवसभर कोसळणाऱया पावसाचे रडगाणे नव्हते तर धारानृत्य होते. जोर कमी होता, पण तो कोसळत होता. आज रविवारीही मुसळधार कोसळेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
गेल्या रविवारी सुलभ हप्त्यात पडणारा पाऊस यावेळी मात्र दमदार बरसला. अधूमधून मुसळधार आणि सततच्या रिपरिपने मुंबईला दिवसभर ओलिताखाली ठेवले. कुलाब्यापासून दादर, शीव, कुर्ला, भांडुप, मुलुंड, ठाणे, बदलापूर, डोंबिवली, कर्जत, कसाऱयापर्यंत तर पश्चिम उपनगरात बोरिवलीपासून वसई, पालघरपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकणात अजूनही पावसाचा धुमाकूळ सुरूच असून उद्याही पाऊस मुंबईकरांचा पाहुणचार घेणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
– कुर्ला पूर्व येथे शुक्रवारी रात्री मॅनहोलमध्ये पडून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिनेश प्रकाश जथोलिया असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. नेहरूनगरच्या प्रगती सोसायटीसमोर काल रात्री ही दुर्घटना घडली. येथील मॅनहोलचे झाकण चोरीला गेल्यामुळे त्यात हा तरुण पडल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला नाल्यातून बाहेर काढले व सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शॉर्टसर्किट आणि झाडे कोसळली
आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण १७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले तर ६ ठिकाणी झाडे कोसळली.
पालिकेच्या पर्जन्यमापक यंत्रावरील नोंदीनुसार झालेला सरासरी पाऊस
शहर भागात – ३१.०६ मिमी
पूर्व उपनगरात – १०.४९ मिमी
पश्चिम उपनगरात – ११.९८ मिमी
हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रावर संध्याकाळपर्यंत ८२.०६ मिमी तर सांताक्रुझ केंद्रावर ९.७ मिमी पावसाची नोंद झाली.
दरड कोसळली
शुक्रवारी सायंकाळी पावणेआठ वाजता भांडुप पश्चिमेकडील खिंडीपाडा येथे दरड कोसळल्याची घटना घडली. तिसरा दर्गाह रोड येथील साईनाथ मित्रमंडळ येथील चाळीलगत दरडीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मुंबई-पुणे एक्प्रेसवेवर ढेकू गावच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. या दुर्घटनेत जीवितहानी आणि वित्तहानी झाली नाही. मात्र कंटेनरच्या केबिनवर भलामोठा दगड कोसळल्यामुळे कंटेनरचे थोडे नुकसान झाले. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलिसांच्या मदतीने दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.



























































