आजपासून सहा दिवस मुसळधार पावसाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आजपासून पुढील सहा दिवस म्हणजेच ११ जूनपर्यंत मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या असून जनतेने काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.

नागरिकांना सूचना
– मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.
– घराबाहेर असाल तर पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
– अतिवृष्टीमध्ये प्रवास टाळा.
– घराबाहेर पडण्याआधी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची तसेच पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती घ्या.
– विजा चमकताना झाडाखाली उभे राहू नका. मोबाईलवरचे संभाषण टाळा, इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहा.
– मुंबईत महापालिकेच्या १९१६ या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा.
– अफवांवर विश्वास ठेवू नका.

प्रशासनाला सूचना
– मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, तहसीलदार येथील नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत ठेवावेत.
– झाडे पडणे, पूर येणे, दरडी कोसळणे इत्यादी परिस्थितीत शोध आणि बचावकार्य तातडीने करतील याचे योग्य नियोजन करा.
– पाणी तुंबणाऱया ठिकाणांवर २४ तास लक्ष ठेवण्यात यावे.
– अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे, आरोग्य अधिकारी, जेसीबी मशीन इत्यादी सज्ज ठेवावे.
– आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यात सर्वच ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर ८ जून रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान,

रायगड जिह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
९ जून रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर १० आणि ११ जून रोजी कोकणातील सर्व जिह्यांमध्ये आणि मुंबईसह उपनगरांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शनिवार, रविवारची सुट्टी कॅन्सल पालिका अधिकारी ऑन डय़ुटी
हवामान विभागाने येत्या शुक्रवारपासून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे या वीकेंडला सर्व पालिका अधिकाऱयांची शनिवार, रविवारची सुट्टी कॅन्सल करण्यात आली आहे. हक्काच्या सुट्टीच्या दिवशी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात आणि आपापल्या कार्यक्षेत्रात ऑन डय़ुटी असणार आहेत.

आपत्कालीन विभाग इन अॅक्शन
– पालिकेचा आपत्कालीन विभाग हा मुंबईतील सर्व प्राधिकरणांचे नेतृत्व करत असतो. त्यानुसार पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर विभागाने सर्व जय्यत तयारी आणि सर्व प्राधिकरणांमध्ये सुसूत्रता आणली आहे.
– राष्ट्रीय आपत्ती निवारणाची तीन पथके शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात तयार असणार आहेत.
– कुलाबा, वरळी, घाटकोपर, ट्रॉम्बे, मालाड परिसरात नौदलाचे पथक तैनात.
– अग्निशमन दलाची सहा पथके तैनात.
– बेस्ट, पोलीस, वाहतूक पोलीस, वैद्यकीय अधिकारी यांचा एक प्रतिनिधी पालिका मुख्यालयात हजर राहणार. त्यामुळे या प्राधिकरणांशी संपर्क साधणे सोपे होणार.
– वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी रेफलेक्टिव्ह जॅकेटसह फिल्डवर.
– पालिकेच्या सर्व शाळा आश्रयस्थाने म्हणून २४ तास सुरू ठेवणार.
– पाण्याचा निचरा करणारे सर्व पंप डिझेल आणि मनुष्यबळासह कार्यरत राहतील याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– झाडे पडण्याच्या दुर्घटना लक्षात घेऊन उद्यान विभागाला आवश्यक साधनसामग्रीसह 24 तास तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.