तीन दिवस मुसळधार, गरज असेल तरच सोडा घरदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

येत्या ८, ९ आणि १० जूनला मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरची वाहतूक ठप्प होण्याची तर रस्तोरस्ती वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता असून या तीनही दिवशी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहनच मुंबईच्या हवामान विभागाच्या अधिकाऱयांनी केले आहे.

स्कायमेट काय म्हणते?
‘स्कायमेट’ या खासगी हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत ८ जून रोजी पावसाला सुरुवात होईल. या दिवशी जोरदार पाऊस पडणार नाही. परंतु ९, १० आणि ११ जून तीन दिवशी मात्र जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळतील. तसेच या तीन दिवशी मुंबईत एकूण ३०० ते ४०० मि.मी. इतक्या पावसाची नोंद होईल.

कशामुळे कोसळणार जोरदार पाऊस?
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे गोवा आणि कोकण किनारपट्टीसह मुंबई, रायगड आणि ठाण्यात जोरदार पाऊस पडेल असे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. मुंबईत तीन ते चार दिवसांत तब्बल ४०० मि.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

१४२ ठिकाणी आश्रयस्थाने
आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना आसरा घेता येईल अशी १४२ आश्रयस्थाने पालिकेने तयार ठेवली आहेत. यात पालिकेच्या शाळा, सभागृह अशा जागांचा समावेश आहे.

माटुंगा, शीवला पाणी भरण्याचा धोका अधिक
मुंबई महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीसाठी केलेल्या अहवालानुसार माटुंगा, शीव, धारावी या विभागांचा समावेश असलेल्या एफ-उत्तर विभागात पाणी भरण्याची सर्वाधिक १६ ठिकाणे आहेत.

पाणी भरण्याची ठिकाणे – १७९
दरडी कोसळण्याची ठिकाणे – २९०
धोकादायक ठिकाणे – ७३
धोकादायक इमारती – ५९०
आश्रयस्थाने – १४२