
सामना प्रतिनिधी। बुलढाणा
१५ ते २० दिवसांच्या उघडीपीनंतर बुलढाण्यात वरुणराजा परता आहे. बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून बुधवारी रात्रीपासून सकाळपर्यंत एकूण १८३.५ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पाऊस लोणार तालुक्यात झाला आहे. या ठिकाणी ३४.८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिके करपू लागली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. याशिवाय शेतातील विहिरी आणि जिल्ह्यातील धरणांत देखील अद्याप पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत पाऊस संततधार सुरूच होता. जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शिवारातील पिकांमध्ये टवटवी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून ही आनंद व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण : बुलढाणा- १४ मि.मी., चिखली – १४.७ मि.मी., सिडखेडराजा -२१.४ मि.मी., लोणार -३४.८ मि.मी., मेहकर -२४ मि.मी., खामगाव – १२ मि.मी., शेगाव – १४ मि.मी., मलकापूर- ८ मि.मी., नांदुरा- १४.१ मि.मी., मोताळा १२.९ मि.मी., संग्रामपूर- ७.८ मि.मी., जळगाव जामोद ७.६ मि.मी. आणि देऊळगाव राजा ८.२ अशी पावसाची नोंद असून संपूर्ण जिल्ह्यात १८३.५ मि.मी. पावसाच नुसार पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.
































































