Video – चंद्रपुरात मुसळधार पाऊस, नागरिकांना उकाड्यातून दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरी वार्षिक पर्जन्यवृष्टीच्या 73 टक्केच पाऊस नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेले दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. आज सकाळपासून काळवंडलेल्या आकाशामुळे पाऊस कोसळेल, असा अंदाज होता.

अखेर मुसळधार पावसाने चंद्रपुरात हजेरी लावली. मात्र यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली. जिल्ह्यात सध्या सोयाबीन व कापूस वेचणीचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या काढणीला मात्र पावसाने फटका बसणार आहे, तर दुसरीकडे मुख्य धान पिकाला मात्र या पावसाने लाभ होणार आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूरकरांना सकाळच्या या दमदार पावसाने उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळाला.