जालन्यात अतिवृष्टी, परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

702

मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत जालना जिल्ह्यात सरासरी 48.75 मि.मी. पाऊस झाला आहे. रात्रभर आणि बुधवारी दिवसभरही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणावर पाऊस सुरु होता. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

जिल्ह्यात एकाच दिवशी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात सरासरी 668.55 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्याची अपेक्षित वार्षिक सरासरी 688 मि.मी आहे. बुधवार आणि गुरुवारपर्यंत वार्षिक सरासरी ओलांडली जाण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे जलाशयातील संचय वाढला असून जालना शहराच्या पाणीपुरवठ्याचा एक स्त्रोत असलेल्या घाणेवाडी तलावाची पाणी पातळी जवळपास सात फुट झाली आहे.

चार महिने पावसाचे उलटल्यानंतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पावसाच्या एकूण सरासरीत वाढ झाली आहे. भोकरदन, अंबड तालुक्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दरम्यान ऐन सोयाबीन, मका, ज्वारी काढणीची वेळ झालेली असल्याने पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कपाशी पीकही लाल पडत असून, वेचणीस आलेल्या कापूस भिजत असल्याने कापसाच्या वाती होत आहे.

jalana-heavy-rain-2

मागील चार महिन्यात परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून जोरदारी लावणे सुरु केल्याने अनेक ठिकाणच्या नदी-नाल्यांना पुर आले आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यात पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. वडीगोद्री व परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओढे-नाल्यांना पुर आलेले आहेत. भोकरदन तालुक्यातील नळणी येथील पुर्णा नदीला मागील चार वर्षांपासून पुर आला नव्हता. परतीच्या पावसाने पुर्णा व गिरजा नदीला पुर आला आहे. तसेच अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या