जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याला पावसाने झोडपले; गल्हाटी प्रकल्प भरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसामुळे शहरातून जाणाऱ्या पाण्याने डावरगाव तलाव पुर्णपणे भरून वाहत आहे. वडीगोद्री महसूल मंडळात 175 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे . या परीसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला मोठा पूर आला आहे आणि ही नदी दुथडी भरून वाहत आहे. याच नदीवर गल्हाटी मध्यम प्रकल्प आहे आणि तोदेखील भरून वाहत आहे. कासारवाडी येथील तलाव भरल्याने नदीला पूर आला असुन सुखापुरी तलाव भरल्याने नदीला पुर आला असल्याने सूखापुरी -अंबड- तिर्थपुरी रस्ता वाहतूक बंद आहे.

पानेगाव सजा अंतर्गत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. दूधना नदी पात्रात पाणी विसर्ग सुरू आहे. गावाला धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुखापुरी मंडळात अतिवृष्टीमुळे गावात घरात पाणी शिरले. तसेच सुखापुरी फाटा ते तिर्थापुरी रस्त्यावरील संगमेश्वर नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोनक पिपळगाव येथील एक चार चाकी वाहनचालक याला पाण्याचा अंदाज न आल्याने वाहन वाहून गेले परंतु यातील तिघांनी वाहनाबाहेर उड्या मारत जीव वाचविला. तसेच सुखापुरी येथील आरोग्य केंद्रातील परिसरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली होती. सुखापुरी येथील झोपडपट्टीत पाऊसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्यात गेले आहेत. या भागात कमरेइतके पाणी साचले आहे.

जालना जिल्ह्यात सरासरी 61.70 मि.मी. पावसाची नोंद
जालना जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 61.70 मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी हाती आली आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

जालना- 81.90(769.50), बदनापूर- 39.50 (694.80) भोकरदन- 37.70 (670.50), जाफराबाद -36.90 (651.20) परतूर- 25.40 (804.00), मंठा-30.70(755.40), अंबड-122.30(877.40), घनसावंगी- 82.40 (875.70 ) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 603.10 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 767.80 मि.मी. एवढा पाऊस झाला असुन त्याची वार्षिक सरासरी 127.31 टक्के आहे.