
खेड तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने शहराला पुराचा धोका कायम आहे. नारिंगी आणि जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने शहरात कधीही पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि व्यापारी यांना सतर्क राहणाच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसात तालुक्यातील तळे म्हसोबावाडी येथे दरड रस्त्यावर आल्याने या वाडीचा तालुक्याशी असलेला संबंध तुटला आहे. हा रस्त्या खचला तर या वाडीत राहणारे ग्रामस्थ आणि शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थांची अडचण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यावरील दरड तात्काळ हटवावी तसेच रस्ता खचणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेले तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खेड शहराजवळून वाहणारी जगबुडी आणि खेड दापोली मार्गावरील नारिंगी या दोन्ही नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता आहे. नारिंग परिसरातील शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे.
नारिंगी नदीचे पाणी पहाटेच्या वेळेत खेड-दापोली या राज्यमार्गावर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे दापोली आणि मंडणगड येथे जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना खेडमध्येच अडकून पडावे लागले होते. साधारण 10 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर आलेले पाणी ओसरले आणि हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
आंबवली विभागात तीन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अद्याप जगबुडीच्या पाण्याचा वेढा शहराला पडलेला नाही. मात्र पाऊस अजून थांबला नसल्याने मार्केट परिसरात आलेले जगबुडीचे पाणी कधी शहरात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी आणि रहिवाशी चिंतेत आहेत.
मुसळधार पावसामुळे अतिशय दुर्गम भागात बसलेल्या तळे म्हसोबावाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमुळे या वाडीचा तालुक्याची असलेला संपर्क तुटला आहे. विद्यार्थ्यांनाही आज शाळेत येता आलेले नाही. त्यामुळे रस्त्यावरची दरड वेळीच बाजूला करून रस्ता मोकळा करण्याची विनंती संबंधित विभागाला ग्रामस्थांनी केली आहे. म्हसोबावाडीत जाणाऱ्या रस्त्याचीदेखील दुरवस्था झाली असून मुसळधार पावसाने रस्ताही खचण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने येथील ग्रामास्थ आणि विद्यार्थी यांच्या चिंतेत भर पडली आहे.





























































