कोकणात बेफाम पाऊस, कुडाळमध्ये 25 गावांचा संपर्क तुटला

492

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस सतत पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यात सोसाट्याच्या वाऱ्य़ामुळे जिल्ह्यात पूरस्थिती आणि वादळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी आणि वाऱ्य़ामुळे होणारे नुकसान यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर वस्तीत पुराचे पाणी शिरले होते. कुडाळ लक्ष्मीवाडी येथे पाणी शिरल्याने 10 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच वायामुळे वेंगुर्ला तालुक्यात 13 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यात दोनशेहून अधिक तर चार तालुक्यात शतक पार पाऊस पडला आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी 151.4 मि.मी च्या सरासरीने 1211.2 मी.मी. तर आतापर्यंत 296.91 च्या सरासरीने 23 हजार 695.35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  

ब्रिटिशकालीन आंबेरी पूल पाण्याखाली; 25 गावांचा संपर्क तुटला

कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्य़ात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने तेथील नर्मला नदीला पूर येऊन आंबेरी येथील ब्रिटिशकालीन पुलावर पाणी आल्याने माणगांव खोऱ्य़ातील सुमारे 25 गावांचा माणगांवशी संपर्क तुटला. मंगळवार सायंकाळ पासून बुधवारी दुपार पर्यंत या पूलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली. या पूलावर पाणी आल्याने शिवापूर, उपवडे, दुकानवाड, आंजिवडे, वसोली आदी 25 गावांचा माणगांव बाजारपेठेशी संपर्क तुटला. या भागात धुवांधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या