कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा दोन वेळा महापुराची स्थिती ओढवल्यानंतर आता जिल्हा पुर्वपदावर येत आहे. त्यातच मंगळवारी दिवसभरात आणि रात्रीतही ढगफुटीसदृश्य पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यासह आसपासची गावे आणि कोल्हापूर शहर व उपनगरातही धडकी भरणारा पाऊस कोसळला. अवघ्या दोन तासात शहरात सुमारे 50 मिमी पावसाची नोंद झाली. पन्हाळा परिसरातील अनेक गावात दरड वाहून रस्त्यावर पाण्याचे लोट येऊन वाहतूक ठप्प झाली होती. शहरात जयंती नाल्याला पूर आल्याने, काठावरील नागरी वस्तीत व घरातही पाणी शिरले. लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. त्यात गेल्या आठवड्यापासून सर्वत्र अधूनमधून ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत आहे. मंगळवारी दुपारनंतर ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यासह बाजूच्या राक्षी,बांबरवाडी आदी गावांत अक्षरक्ष: ढगफुटी होऊन, प्रचंड वेगाने पाण्याचे लोंढे वाहत होते. रस्त्यांवर दरडी वाहून आल्याने मार्ग बंद झाले होते. अनेकांची शेतात पाणी शिरले. मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर शहरालाही ढगफुटीसदृश्य पावसाने झोडपून काढले. जयंती नाल्याच्या पात्रातही अचानक वाढ झाल्याने रात्री कुंभारगल्ली वस्तीत पाणी घुसले. इतर नाल्यांनाही पूर आला आणि पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. जयंती नाल्याच्या मार्गावरील विल्सनपूल येथील फुलगुलेश्वर मंदिर अवघ्या तासाभरात पाण्यात बुडाले. त्यामुळे महानगरपालिका यंत्रणा कामाला लागली होती. जोरदार कोसळणारा पाऊस आणि रस्त्यांवर वाढत जाणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांनी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या