यंदाच्या दिवाळीत फटाके भिजणार, राज्यात तीन दिवस मुसळधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. परतीच्या पावसाला तब्बल एक महिन्याहून जास्त उशीर झाला असतानाच जातो…जातो…म्हणणारा पाऊस आता दिवाळीला हजेरी लावूनच जाणार आहे. 25 ऑक्टोबरला वसुबारस असल्यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाके भिजवूनच पाऊस विश्रांती घेणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला पावसाचा धिंगाणा आता आणखी तीन दिवस चालणार आहे. पुणे, नगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, धाराशीव आणि बीडसह राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाची दादागिरी 

अरबी समुद्रात आणि बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही भागांत 23 ते 27 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात कुठे, कसा बरसणार 

पुण्यात 23 ते थेट 28 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम सरींसह पाऊस पडणार आहे. कोकण आणि गोव्यात 22 ते 23 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल. सिंधुदुर्गात 22 ते 26 ऑक्टोबरपर्यंत मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 22 ते 24 ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटांसह पाऊस होईल. नगर, कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात पावसाच्या जोरदार सरी पडतील. विदर्भातील बुलढाणा, गोंदिया आणि गडचिरोलीत 23 ऑक्टोबरला पाऊस होणार आहे.