मुंबईला सलग दुसर्‍या दिवशी पावसाने झोडपले; आजही अतिवृष्टीचा इशारा

587

मुंबईसह राज्यभरात सोमवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस आजही सुरुच राहिला. त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. प्रचंड गडगडाट आणि जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे-झाडाच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे वाहतूकही मंदावली. राज्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून आज गुरुवारीही अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार सोमवारपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा जोर इतका जास्त झाला आहे की शासकीय-खासगी कार्यालयांना कालपासूनच सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्ता खचने, शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. चर्चगेटकरून सीएसटीला येणार्‍या मार्गावर मुंबई जिमखानाजवळ अनेक बस गाड्यांकर झाडे उन्मळून पडली. दुपारी 1 वाजून 19 मिनिटांनी समुद्रालाही उधाण आले. त्यामुळे प्रचंड उंचीच्या लाटा उसळल्या. शिवाय याच वेळी अतिवृष्टी झाल्याने हिंदमाता, किंग्ज सर्कल, बीपीटी स्कायवॉक, गांधी मार्केट, शेख मिस्त्री दर्गा रोड, शीव रोड, पोस्टल कॉलनी चेंबूर, अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट, दहिसर सबवे अशा अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले. जोरदार पाऊस आणि पाणी साचल्याने ‘बेस्ट’च्या काही मार्गावरील वाहतूकही वळवावी लागली.

123 ठिकाणी झाडे कोसळली, 24 शॉर्टसर्किट

जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शहरात 35, पूर्व उपनगरात 21 तर पश्चिम उपनगरात 65 अशा 123 ठिकाणी झाडे-झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. याबाबत आपत्कालीन विभागाकडे आलेल्या तक्रारींनंतर पालिकेच्या माध्यमातून तातडीने कार्यकाही करण्यात आली. दरम्यान, शहरात 15, पूर्व उपनगरात 1 तर पश्चिम उपनगरात 8 अशा 24 ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जे. जे. रुग्णालयात पाणी शिरले

वादळी वारा आणि पावसामुळे भायखळा येथे जे. जे. रुग्णालयातील मुख्य इमारतीत पाणी शिरले. त्यामुळे बाहेरून येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स, सुरक्षारक्षक तसेच इतर कर्मचाऱ्य़ांची मोठी तारांबळ उडाली. मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिल्यामुळे कधी नव्हे ते जे. जे. रुग्णालयात पाणी साचले. कर्मचाऱ्य़ांना नाईलाजाने पाण्यातून वाट काढतच रुग्णालयात ये-जा करावी लागत होती. रुग्णांसाठी स्ट्रेचर, व्हिलचेअर तसेच ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाताना कर्मचाऱ्य़ांना मोठी कसरती करावी लागत होती.

आपली प्रतिक्रिया द्या