मुंबई उपनगर, भिवंडी, पालघरसह पुण्यात मुसळधार

413

अर्धा सप्टेंबर महिना संपला तरीही पावसाचे रिटर्न तिकीट कन्फर्म झालेले नाही. गणेशोत्सवातही पावसाने जोरदार हजेरी लावत मुंबई, ठाण्याला झोडपले. ‘आता बस बाबा, भरपूर पडलास’ असे मुंबईकर त्याला विनवत असले तरीही तो पडतोच आहे. मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार, पुण्यात संततधार तर वसई, विरार आणि ठाण्यात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवडय़ात पाऊस महाराष्ट्रातून काढता पाय घेतो, परंतु पावसासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे पावसाला अजूनही परतीचे वेध लागलेले नाहीत.

असा निरोप घेतो पाऊस

  • साधारणतः 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीच्या पावसाला सुरुवात होते.
  • 15 सप्टेंबरपर्यंत राजस्थान, पंजाब, कच्छच्या काही भागांतून,
  • त्यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रातून गायब होतो.
  • देशभरातून 30 सप्टेंबरपर्यंत माघारी फिरतो.

जुलै, ऑगस्टमध्येच वर्षभराची सरासरी

यंदा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार तडाखा देत वर्षभराची सरासरी गाठली. मुंबई, ठाण्यात 1 ते 4 सप्टेंबर या चारच दिवसांत 400 मिमी इतका पाऊस पडला. या पावसाने 11 वर्षांचा रेकॉर्ड मोडला.

19 सप्टेंबर

यंदा हवामान विभागाचे बरेच अंदाज पावसाने चुकीचे ठरवले आहेत. महाराष्ट्रात 19 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरेल आणि पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  

वर्ष       परतीचे तिकीट (सप्टेंबर)

2018      29

2017      28

2016      15

2015      04

2014      23

2013      09

2012      24

2011      23

 

आपली प्रतिक्रिया द्या