
नगर, पारनेरसह जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासूनच पावसाने दमदार बॅटिंग केली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारीही सकाळपासूनच पाऊस कोसळत असून, सततच्या पावसामुळे बहुतांशी धरणे, तलाव तुडुंब भरले आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत सरासरी 106 टक्के पाऊस झाला आहे.
राज्यात पुढील पाच दिवस दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नगर जिल्ह्यातही दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली. नगर शहरात दुपारी एकच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे नगर शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मुळा धरणातून पाच हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीत 10 हजार 552 क्युसेकने, भीमा नदीत 31 हजार 758, घोड नदीत 13 हजार 920 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
चारचाकी वाहन वाहून गेली; चालक बचावला
पारनेरमध्ये पाऊस सुरू झाल्यावर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत परिसरातील ओढे, नाल्यांना मोठा पूर आला. अळकुटी शिवारातील बेल्हे रस्त्यावर, गोकुळबाग परिसरातील पुलावरून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहू लागले. या पुरात चारचाकी वाहन वाहून गेले. वाहनचालक नितीन चौधरी (गारखिंडी, पारनेर) याला स्थानिक तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत वाचवले. दोराच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.
जामखेड, पाथर्डीत कमी, अकोल्यात सर्वाधिक पाऊस
गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे जिह्यात सरासरी 106 टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यात जामखेड व पाथर्डी तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. जामखेडला 68.6, पाथर्डी 87.9, नेवासा 96.0, श्रीरामपूर 93.3, शेवगाव 99.7, नगर 94.6 टक्के पाऊस झाला आहे. जिह्यातील इतर तालुक्यांत सरासरी शंभर टक्क्यांच्या पुढे पाऊस झाला आहे. अकोल्यात सर्वाधिक 153 टक्के पाऊस झाला आहे.
पारनेरच्या पश्चिम भागाला अतिवृष्टीचा दुसऱ्यांदा तडाखा
पारनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील अळकुटी, गारखिंडी, कळस, दरोडी, रांधे, पाडळी आळे परिसराला पाच दिवसांत दुसऱ्यांदा अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रांधे येथील चोरदरा परिसरातील पाझर तलाव फुटला. त्यामुळे दोन विहिरी गाडल्या गेल्या. शेतजमिनींमधील माती वाहून गेली. पाच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात म्हस्केवाडी येथे 12 शेळ्या वाहून गेल्या होत्या. पावसामुळे काढणीला आलेल्या मूग, बाजरी, सोयाबीन तसेच मक्यासह इतर चारापिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सीना धरण ओव्हरफ्लो
कर्जत, श्रीगोंदा व बीड जिह्यातील आष्टी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण यावर्षी सप्टेंबर महिन्यात भरले आहे. या धरणाची क्षमता 2.4 टीएमसी आहे. धरण भरल्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणीही भोसा खिंडीच्या बोगद्यातून सीना धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळेही धरण भरण्यास मदत झाली आहे. दरम्यान, धरण भरल्याने सीना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मांडओहोळचे उपविभागीय अधिकारी एस. के. शेळके यांनी दिली आहे.
कोयना विभागात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या 100.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात 4.33 टीएमसी पाणी सामावून घेण्याची क्षमता शिल्लक आहे. त्यामुळे रविवारी रात्री धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून कोयना नदीपात्रात 1050 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
ओढय़ाच्या पाण्यात अडकले विद्यार्थी
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. करमाळा तालुक्यातील पाडळी व अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नाले व ओढे भरून वाहत आहेत. त्यामुळे या दोन गावांत ओढय़ाच्या पाण्यात विद्यार्थी अडकले होते. शिक्षक व पालकांच्या मदतीने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या पावसामुळे शालेय इमारतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.
करमाळा तालुक्यातील पाडळी येथे सोमवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे शिंगटेवस्तीजवळ असलेल्या ओढय़ाला मोठय़ा प्रमाणावर पाणी आले होते. या ओढय़ावरूनच विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करावी लागते. पाडळीपासून तरटगावकडे येणाऱ्या रस्त्याजवळ ओढा वाहतो. या ओढय़ालगतच शिंगटेवस्ती असून, येथील जवळपास 20 मुले शाळेसाठी गावात येतात. सातवीपर्यंतची मुले असून, दुपारी मोठा
पाऊस झाल्याने ओढा मोठय़ा प्रवाहाने वाहत असल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. ओढय़ातून विद्यार्थ्यांना घराकडे येता येत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी ट्रक्टरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. येथील गावकऱ्यांची पूल बांधण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथेही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरातूनच ओढा वाहतो. आज दुपारी पावसामुळे जवळपास तीन-चार फूट उंचीवरून पाणी वाहत होते. कन्नड, मराठी व उर्दू माध्यमाची ही शाळा असून, अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. पालक व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.






















































