
सामना प्रतिनिधी । मुंबई
बंगालच्या उपसागराकडून येणाऱया एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मुंबई, विदर्भ, कोकण, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामानतज्ञांनी वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
7 ऑगस्टला पूर्व विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील, परंतु 8 ऑगस्टला विदर्भातील बऱ्याच भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल ज्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिह्यांत 8 आणि 9 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान उर्वरित मध्य महाराष्ट्रातदेखील पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिह्यांत 8 आणि 9 ऑगस्टला पावसात वाढ होण्याचा अंदाजदेखील हवामानतज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भात 9 ऑगस्टपासून तर मध्य महाराष्ट्रात 10 ऑगस्टपासून हवामानाची स्थिती सामान्य होईल. यादरम्यान पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील लोकांनी सतर्प राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
पूर ओसरल्यानंतर त्या भागात साथीच्या आजारांचा फैलाव होतो हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. त्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी पथके कार्यान्वित आहेत. ठाणे मंडळामध्ये 114 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. कोल्हापूर मंडळात 37, पुणे 10 अशी राज्यभर सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागांत आरोग्यसेवेसाठी 162 वैद्यकीय पथके
राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, कावीळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 14 हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्प आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.




























































