पारधमध्ये अतिवृष्टी, अर्ध्या गावात पाणी घुसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारध

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील येथे आज २९ जुनला दुपारी १२ वाजेला मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि एका तासात होत्याचे नव्हते झाले. पाहता रायघोळ नदीने रौद्ररुप धारण केले. अर्ध्या गावात पाणी साचले अन् २००६ ची आठवण करून गेले.

पारध येथे गेल्या आठवड्यापासून वरुणराजाने कृपादृष्टी केली आहे. आतापर्यत नदीला चारवेळा पूर आला. शनिवारी दुपारी  विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने थैमान घातले. बघता बघता रायघोळ नदीला पूर आला. पूर एवढा मोठा होता की पाराश्वर मंदिरही चोहोबाजूने वेढले. गणेशवाडीत पाणी घुसायला सुरूवात झाली. जनता विद्यालय, स्व.राजेद्र श्रीवास्तव इग्लीश स्कुल, जिल्हा परिषद शाळा, चार बालवाड्या, पशुवैद्यकीय दवाखाना आदी ठिकाणी कमरेवर पाणी आले. आज शनिवार असल्याने जनता विद्यालय वगळता सर्व शाळा सकाळीच सुटल्या होत्या. जनता विद्यालयाचे उदयसिंह लोखंडे, प्राचार्य व्ही. जी.दैशमुख, संग्रामराजे देशमुख, रवी लोखंडे यांनी व त्यांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले.

यावेळी पारध गावचे प्रथम नागरिक शेखर श्रीवास्तव, ग्रामविकास अधिकारी गजानन उंबरकर, माजी उपसरपंच रवी आल्हाट यांनी मदत केली. या संपूर्ण परिस्थितीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी भर पावसात सपूर्ण गावाची पाहणी करुन रात्री सतर्क राहण्याची सल्ला दिला आहे.