
सामना ऑनलाईन । रत्नागिरी
कोकणात पावसाने आज पहाटे पासून धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून चिपळूण, खेड परिसर जलमय झाला आहे. गुहागर भातगाव रत्नागिरी मार्गावरील फुणगुस येथे दरड कोसळली व पावसाच्या पाण्यानी रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. ढगाळ वातावरणासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
चिपळून तालुक्यातील वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. मुंबई-गोवा महामार्गाजवळील मळ्याचा गणपती मंदिरालाही पाण्यानी वेढा घातला आहे. चिपळूण बाजारपेठ जलमय झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. खेड तालुक्यात जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.

































































