
गेले पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राजापूरच्या जवाहर चौकात सलग दोनवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ता खचणे, दरड कोसळणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे 19 हजार 600 रुपयांचे, शंकर जानू गोरे यांच्या घरामध्ये पाणी शिरुन अन्नधान्य, कपडे व घराचे 29 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यातील वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे 3 लाख 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वरमधील ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे 27, 600 रुपयांचे, कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा बांध पडून घराचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशींचा वीजेच्या शॉक लागून मृत्यू पावल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 89.07 मिमी तर एकूण 801.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 102. 10 मिमी, दापोली 89.20 मिमी. खेड 70.70 मिमी, गुहागर 94.80 मिमी, चिपळूण 70.40 मिमी, संगमेश्वर 67.60 मिमी, रत्नागिरी 86.50 मिमी, राजापूर 99.60 मिमी, लांजा 120.70 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.























































