
गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वरसह फुणगुस, माखजन आरवली, साखरपा, बावनदी, कोळंबे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजारपेठांमधून पुराचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आह. पहाटेच्या सुमारास अचानक पाणी वाढल्याने व्यापाऱ्यांना आपला माल सुरक्षित स्थळी हलवणे शक्य झाले नाही.
https://www.saamana.com/chiplun-flood-konkan-rain-maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-review/
फुणगुस आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे. फुणगुस कडून संगमेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबेड येथे पाणी असल्यामुळे संगमेश्वरकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे, त्यामुळे संगमेश्वरशी संपर्क तुटला आहे. मागील दोन वर्षात पहिल्यांदा शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे फुणगुस बाजारपेठेशी निगडीत असलेल्या आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला आहे. संगमेश्वर नायरी मार्गावर कसबा येथे पाणी भरल्याने हा मार्ग पहाटेपासून बंद आहे. कसबा हायस्कूलमध्ये पुराचे सहा फूट पाणी घुसून मोठे नुकसान झाले. संगमेश्वर देवरुख मार्गावर लोवले, मयुरबाग, बुरंबी या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग पहाटे पासून बंद आहे.

बावनदी पुल वाहतूकीसाठी बंद
मुसळधार पावसामुळे बावनदीला पूर आला असून पुराचे पाणी पुलाला टेकल्यामुळे सावधानता बाळगत या पुलावरची वाहतूक आज सकाळी 7 वाजल्या पासून बंद करण्यात आली आहे. यामुळे देवरुख-रत्नागिरी मार्गही बंद झाला असून बावनदी पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.

कासारकोळवण येथील साकव वाहून गेला
संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण गावातील नदीवर असणारा साकव पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेला असून या गावाचा संपर्क आता तुटला आहे.

आंबा घाट येथे रस्ता खचला
रत्नागिरी कोल्हापूर हायवे वर आंबा घाटात सकाळी कोल्हापूरकडे जाणारा रस्ता खचला आहे. यामुळे वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. आंबा घाट व साखरपा पोलीस स्थानक या दोन ठिकाणी बॅरीगेट टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच मागील काही दिवसांपासून सुरू असलेली दरड कोसळण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले.





























































