सिंधुदुर्गात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

गेले चार दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी दुपारी जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. गडगडाटाचा आवाज आणि अचानक पडणाऱ्या पावसामुळे जिल्हावासियांची तारांबळ उडाली. दुपारच्या सत्रात पडलेल्या वादळी पावसाने जानवली येथे महामार्गावर झाड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.

मागील चार दिवसापासून जिल्ह्यात गडगडाटासह पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांसह जिल्हावासियांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी झाडे घरावर पडत आहेत तर विद्युत् वहिन्यांवर झाडे पडून विद्युत् पुरवठाही खंडित होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत, असे असतानाच आज झालेल्या वादळ, लखलखाट, यासह जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्य़ाला झोडपले आहे. असे असले तरी पुढील चार दिवसात जिल्ह्यात गडगडाटीसह सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार ४ ऑक्टोबर पर्यंत सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

शेतकरी चिंतेत
गेले चार दिवस जिल्ह्यात गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडत आहे. एकीकडे घरांवर झाडे पडून नुकसान होत असतानाच परतीच्या मुसळधार पाऊस असाच पडत रहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले भात पिक ख़राब होण्याची शक्यता पाहता जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.