सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, कुडाळ तालुक्यात पुन्हा पूरस्थिती

450
धो धो कोसळणार्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यासह सर्वत्र मुसळधार पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे कुडाळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. माणगांव खोर्‍यातील आंबेरी येथील ब्रिटिशकालीन पुलावर पाणी आल्याने माणगांव खोर्‍यातील सुमारे 27 गावांचा माणगांवशी संपर्क तुटला. तर कुडाळ भंगसाळ नदीच्या पुराच्या पाण्याने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील पाच ते सहा घरांना तर हातेरी नदीच्या पुराच्या पाण्याने वेताळबांबर्डे तेलीवाडी येथील चार घरांना वेढा घातला. या दोन्ही ठिकाणच्या नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ठिकठिकाणची भातशेती पाण्याखाली जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. धो धो कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कुडाळ तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी पुन्हा एकदा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. कुडाळ भंगसाळ (कर्ली), वेताळबांबर्डे हातेरी नदी व हुमरमळा पिठढवळ या तिनही नद्यांना पूर आला.

माणगांव खोर्‍यातील सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने निर्मला नदीला पूर येऊन ब्रिटिशकालीन आंबेरी पुल पाण्याखाली गेले. सुमारे चार ते पाच तास हे पुल पाण्याखाली होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतुक खोळंबली होती. त्यामुळे उपवडे, दुकानवाड, शिवापूर, आंजिवडे, वसोली, वाडोस, आंबेरी, निळेली आदी 27 गावांचा माणगांवशी संपर्क तुटला होता. त्याचबरोबर दुकानवाड, शिवापूर या भागातील कॉजवेही पाण्याखाली गेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या