
सोलापुरात आज मुसळधार पाऊस झाला, जिल्ह्यात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला असून वैराग जवळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोलापुरातील कारंबा येथील ओढा देखील भरून वाहत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. कुरनूर धरणाच्या ६ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. वैराग शहराला पाणीपुरवठा करणारा हिंगणी प्रकल्प नुकताच ओव्हरफ्लो झाला होता. पावसामुळे वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. कारंबा येथील ओढा ओव्हर फ्लो झाल्यामुळं नागरिकांनी पाण्यातून वाट काढत जीवघेणा प्रवास सुरू आहे. दूधविक्रेत्यांनी जीव धोक्यात घालून या ओढ्यातून शहराकडे प्रवास केला. सध्या कारंबा येथील ओढ्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे.
अक्कलकोट राजवाड्याचा दुर्बिण बुरुज ढासळला
पावसामुळे अक्कलकोट जूना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज 373 वर्षांनी ढासळला आहे. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र)यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती केली होती.
कुरनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले
सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं अनेक धरण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. कुरनूर धरण क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या सहा दरवाजातून 1800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो
बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला होता. हिंगणी प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. यामुळे वैराग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला होता. भोगावतीला पूर आल्यानं रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाने पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन सह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणा तपाणीसाठी असून अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे याशिवाय सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचा काही भागावर तलावाचे पाणी आले आहे.

























































