देशभरात पावसामुळे गेल्या चार दिवसात 129 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात पावसाने हाहाकार उडाला असून गेल्या चार दिवसात पावसामुळे 129 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तब्बल 79 जणं ही उत्तर प्रदेशमधील आहेत.

गेल्या चार दिवसात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या चार दिवसात 79 जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून आतापर्यंत तेथे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पुण्यात एका रात्रीत झालेल्या अतिवृष्टीमुळे 19 जणांचा जीव गेला आहे. याव्यतिरिक्त पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू कश्मीर, उत्तराखंडमध्येही पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहार व उत्तर प्रदेशमधील अनेक भागांत सध्या पाऊस सुरू असून तेथील गावांमध्ये सध्या भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही राज्यांतील पूरग्रस्त भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून रुग्णालयांमध्ये देखील पूराचे पाणी भरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.