
परतीच्या पावसाने नगर जिह्याला चांगलेच झोडपले आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. सीना नदीला पूर आला आहे. उभी पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, नदी, तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. जिह्यात एकूण 28 मि. मी. पावसाची नोंद झाली. राशिन व पेडगाव महसूल मंडळात सर्वाधिक अनुक्रमे 124 व 93 मि. मी. पाऊस झाला. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळाने दिशा बदलल्याने नगर जिल्ह्याला दिलासा मिळाला. जिल्ह्यातून होणारा वादळाचा संभाव्य प्रवास टळला आहे.
हवामान खात्याने तीन दिवस जिह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. बुधवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. जिह्यातील अनेक भागांत शेतात पाणी साचले. शेतातील कांदा, कापूस, सोयाबीन, मका, ऊस या पिकांबरोबरच फळबागांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
धरणांतून विसर्ग
गुरुवारी दुपारी भीमा नदीच्या विसर्गात वाढ करण्यात आली. भंडारदरा धरणातून 812 क्युसेक्स, निळवंडेमधून 1 हजार 640, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून 404, जायकवाडी धरणातून 13 हजार 624, भीमा नदी दौंड पूल येथून 39 हजार 180, घोड धरणातून 6 हजार, मुळामधून 2 हजार, तर सीना धरणातून 1 हजार 758 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.





























































