
सांगली जिह्यात गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. ‘कायम दुष्काळी’ म्हणून ओळखणाऱया जत तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाले भरभरून वाहत आहेत. वळसंग ते पाचापूर पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने सांगली जिह्यात हाहाकार उडाला आहे.
विजांच्या कडकडाटासह सांगली जिह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा तालुक्यांतील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. जत तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. सांगली जिह्यातील ‘कायम दुष्काळी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया जत तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. 24 तास कोसळणाऱया संततधारेमुळे जत तालुक्यातील ओढे-नाले पाण्याने ओसंडून वाहत आहेत. तर, वळसंग ते पाचापूर या पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जत तालुक्यात पहिल्यांदाच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने या तालुक्यातील शेतकरी आनंदित झाले आहेत.
दरम्यान, सांगली शहर परिसरातही काल रात्रीपासून आज दिवसभरात पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. स्टेशन रोड व राजवाडा चौक परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पावसामुळे रस्ते सुनसान पडले होते. यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र, पावसाने कालपासूनच सांगली जिह्यात दमदार हजेरी लावली आहे. शहरात पावसाने सायंकाळनंतर उसंत घेतली. मात्र, जिह्याच्या अनेक भागांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या.
जत तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी
दुष्काळी जत तालुक्यात सर्वाधिक 93 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय अनेक परिमंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. कवठेमहांकाळ तालुक्यात वीज पडल्याने 27 मेंढय़ा दगावल्या. जोरदार पावसाने जत-उमदी, जत-गुड्डापूर, येळावी-आमणापूर या मार्गांवरील वाहतूक काही काळ बंद राहिली. गुड्डापूरच्या धामण्णादेवी मंदिरामध्ये पावसाचे पाणी शिरले. काही गावांतील मातीच्या घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. पावसाच्या पाण्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते. सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असला, तरी पेरणीसाठी तो अनुकूल नाही. त्यामुळे मान्सून सक्रिय झाल्यानंतरच खरिपाच्या पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिह्यात संततधार पाऊस
जिह्यात काल सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस आज दुसऱया दिवशीही सायंकाळपर्यंत सुरू होता. रात्रभर आणि दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. शहरात सखल भागांत पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. तर, काही भागांत वृक्ष कोसळल्याने काही वाहनांचे नुकसान झाले. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून वेळेपूर्वी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच, जिह्यात काल सायंकाळी सहानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. तर, आज सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची जोरदार मध्यम आणि हलक्या स्वरूपात संततधार सुरूच राहिली. त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. पर्यटकांसह फेरीवाल्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती. काही नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावे लागले. मान्सूनपूर्व पावसाने हातकणंगले तालुक्याला चांगलेच झोडपले. गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱयासह सुरू झालेला पाऊस शुक्रवार सायंकाळपर्यंत कायम होता. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
सातारा शहरासह परिसरात मुसळधार पाऊस
सातारा शहर व परिसराला गुरुवारी मध्यरात्रीनंतर मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. उकाडय़ामुळे हैराण झालेल्या जनतेला या पावसाने दिलासा मिळवून दिला. गुरुवारी दिवसभर हवेत असह्य उष्मा जाणवत होता. हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज वर्तविलेला होता. मात्र, दिवसभरात पाऊस झाला नाही. संध्याकाळी सातनंतर पाऊस ठिपकायला लागला; पण त्यात जोर नव्हता. मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास सातारा शहर व परिसरात अचानकपणे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर या पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. जिह्यातही काही ठिकाणी हलकासा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तसेच वातावरणही काहीसे थंड राहिले. गेल्या काही दिवसांत उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला या पावसाने दिलासा मिळाला.




























































