मुंबई कोकणात आज जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला ऑरेंज ऍर्लट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
taxi in mumbai rain

मुंबईसह कोकणात शनिवारी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्यातर्फे मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अर्लट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि कोकणवासियांना आपल्या लाडक्या गणरायांचे आगमन पावसात करावे लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने दर्शविलेल्या ऑरेंज अर्लटनुसार संबंधित प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई हवामान खात्याच्या वरिष्ठ संचालिका शुभांगी भुते यांनी दिलेल्या  माहितीनुसार, पूर्व मध्य प्रदेशावर तीव्र कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मध्य हिंदुस्थानात पावसाचा जोर काढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱयांचा जोरही यावेळी वाढलेला असेल. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी माहिती मुंबई हवामान खात्याच्या वरिष्ठ संचालिका शुभांगी भुते यांनी दिली.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पाऊस दहिसर येथे नोंदला गेले. दहिसर येथे तब्बल 209 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कल्याण- डोंबिवली येथेही 24 तासांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे निदर्शनास आले. प्रामुख्याने उत्तर मुंबईमध्ये हा जोर अधिक होता. दिवसभरात दहिसर, कांदिवली, मालाड येथे 75 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. सांताक्रूझ आणि वांद्रे येथेही अनुक्रमे 81 आणि 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.