अतिवृष्टीचा फटका, दिवाळी तोंडावर येऊनही बाजारात सोयाबीनची आवक नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरीप हंगामात राज्यभर कोसळलेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादनाला बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी वर्गात दिवाळीच्या आधी सोयाबीन खरेदीची लगबग सुरू होते. मात्र यंदा अवकाळी पाऊस- महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे.

त्याचा परिणाम म्हणून दिवाळी काही दिवसांवर आली असली तरी बाजार समितीत अद्याप सोयाबीनची आवक झालेली नाही. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरकारने ठरवून दिलेल्या 3880 या हमी भावानुसार सोयाबीन खरेदी साठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र या दरानुसार सोयाबीन विक्रीसाठी अद्याप एकाही शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही.

याउलट खुल्या बाजारात मात्र आजचा दर 4300 ते 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे. चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने कहर केला असताना यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. यापुढच्या काळात सोयाबीनच्या बाजारात तुटवडा निर्माण होण्याची चिन्हे असून त्यामुळेच पहिल्या काही मोठ्या ग्राहकांनी सोयाबीनचा साठा करून ठेवण्याकडे कल दाखविला आहे.

त्याचा परिणाम बाजारातील सोयाबीनचे दर वाढण्यावर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन कापणी झाली आहे, त्यांना खुल्या बाजारातील हा दर निश्चित सुखावणारा ठरत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समिती शिवाय अन्यत्र कुठेही विक्री करण्याची मुभा करणारा कायदा संमत केला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये हा कायदा लागू झाला आहे. मात्र महाराष्ट्रात राजकीय कारणांमुळे अजूनही या कायद्याला राज्यांची संमती मिळू शकलेली नाही. तरीही खुल्या बाजारातील सोयाबीनच्या उच्चांकी भावाने शेतकरी मात्र सुखावला आहे. एकीकडे हाती आलेले उत्पादन थेट बाजारात नेऊन दिवाळीच्या तोंडावर नगदी रक्कम गाठीशी बांधणारे शेतकरी आहेत.

तर दुसरीकडे याहून अधिक भाव मिळेल म्हणून बाजार समितीतील शेतमाल तारण योजनेत आपली नाव नोंदणी करणारे शेतकरी देखील आहेत. शेती तज्ज्ञांच्यानुसार मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचा हा दर पाच हजार प्रति क्विंटल असेल असा कयास लावला जात आहे.

पाहा व्हिडीओ-