
गेले आठवडाभर रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने आज अखेर विश्रांती घेतली. शुक्रवारी रत्नागिरीकरांना सूर्यकिरणे अनुभवता आली. दरम्यान आजही पाऊस येईल या शक्यतेने शाळांना सुट्टी देण्यात आली होती. काल जिल्ह्यातील नद्या इशारा पातळीच्यावर वाहत होत्या. आज नद्यांची पातळी कमी झाली. कोदवली आणि जगबुडी या दोन नद्या इशारा पातळीवरती वाहत होत्या.
जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 701 मिमी आणि सरासरी 77.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 82.60 मिमी, दापोली 67.30 मिमी, खेड 65.30 मिमी, गुहागर 58.20 मिमी, चिपळूण 68.60 मिमी, संगमेश्वर 97.20 मिमी, रत्नागिरी 90. 10 मिमी, लांजा 114.90 मिमी, राजापूर 56.90 मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ऑनफिल्ड
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भर पावसात कळवंडे धरणावर जाऊन धरणाच्या कामाची पाहणी केली आणि तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. या धरणाजवळ प्रचंड चिखल होता. हा चिखल तुडवत ते धरणाजवळ पोहोचले. त्याचबरोबर बावनदीवरील पुलाची त्यांनी पाहणी केली.























































