संततधार पावसाने भिंत पडून महिला जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

मागील चार ते पाच दिवसांपासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील एका घराची भिंत खचून ती अंगावर पडल्याने या भिंतीखाली दबून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर एक महिला व दोन मुले या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

याबाबत अधिक वृत्तांत असा की, मागील चार ते पाच दिवसांपासून वडवणी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. या परतीच्या पावसाने सामान्य जनजीवन तर विस्कळीत झाले आहेच शिवाय इतरही अनुचित प्रकार घडत आहेत. शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोंबर 2019 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वडवणी तालुक्यातील चिंचवण या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता. याच वेळी शेख अन्वरबी रसूल वय 65 वर्ष रा.चिंचवण या महिला त्यांच्या शेजारी असणाऱ्या नेटके यांच्या घरी सहज गेलेल्या होत्या. मात्र अचानक नेटके यांच्या घराची एक जुनी मोठी भिंत सततच्या पावसामुळे पाणी मुरल्याने ढासळत असल्याचे लक्षात येताच बेसावध असलेल्या शेख अन्वरबी रसूल या त्या भिंतीखाली दबल्या गेल्या यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गीता सुग्रीव नेटके व इतर दोन मुले यांच्या अंगावरही भिंतीचा काही भाग कोसळल्याने यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या तिन्ही जखमींना अधिक उपचारार्थ बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तरी प्रशासनाने तात्काळ शेख कुटुंबीयांना व नेटके कुटूंबियांना आपत्कालीन विभागातून शासकीय आर्थिक मदत द्यावी अशी मागणी चिंचवण ग्रामस्थांमधून होत आहे.