
सामना प्रतिनिधी, नांदेड
नांदेड जिल्ह्यात आठ तालुक्यात काल रात्री व आज पहाटे अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्याचा अनेक भाग जलमय झाला आहे. माहूर तालुक्याने १८८ मि.मी. तर किनवट तालुक्याने १३३ मि.मी.विक्रमी पावसाची नोंद केली असून, किनवट, माहूर तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुराने हाहाकार उडाला आहे. किनवट शहरातील जवळपास पाचशे ते सहाशे घरांमध्ये पाणी घुसले असून नांदेड शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने लोकांना मुख्य रस्त्यावर येण्यास अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान विष्णूपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे आज उघडण्यात आले असून, या दरवाजातून ४७१ क्युसेक्स वेगाने पाणी गोदापात्रात सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
गेल्या ४८ तासापासून नांदेड जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस पडत आहे. मात्र अद्यापही देगलूर, नायगाव, बिलोली आणि मुखेड तालुक्यात हवा तसा पाऊस झालेला नाही. माहूर तालुक्यात गेल्या २४ तासात १८८ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस झाला असून त्यामुळे या भागातील अनेक खेड्यात व शहरात रस्ते जलमय झाले आहेत. पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहून जात असल्याने अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. त्या खालोखाल किनवट तालुक्यात १३३ मि.मी.पाऊस झाला असून, पैनगंगा नदीचे व नाल्याचे पाणी वेगवेगळ्या भागात शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाने हे पाणी काढण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा लावल्या आहेत. नांदेड शहरात व तालुक्यात देखील ११३.५० मि.मी. पाऊस झाल्याने शहराच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. शहरातील हमालपूरा, शिवनगर, दत्तनगर, गोकुळनगर, हिंगोलीगेट, बाफना चौक, अण्णाभाऊ साठे चौकातील काही परिसर, खडकपूरा, शहिदपूरा, शिवनगर, श्रावस्तीनगर, दत्तनगर या भागात अनेक घरात पाणी शिरल्याने मनपाने या ठिकाणी युद्धपातळीवर यंत्रणा सुरू केली आहे. हिंगोली गेट भुयारी मार्ग पावसाने काठोकाठ भरल्यामुळे या भुयारी पुलातून वाहतूक ठप्प झाली आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या आठ तालुक्यात ढगफुटी झाल्याने प्रशासनाने आपल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क केल्या आहेत.




























































