परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपले, चौदा मंडळांत अतिवृष्टी

1298

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागातील नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. या जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाडा विभागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी-कमी होत आहे. परिणामी या भागातील नागरिकांना सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात प्रारंभी समाधानकारक पाऊस झाला नाही. नंतर मात्र वेळ चुकवून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे विभागात आतापर्यंत पडलेल्या पावसाची वार्षिक सरासरी टक्केवारी ही 77.39 वर पोहचली आहे. यामध्ये परतीचा पाऊसच अधिक आहे. आजही या विभागात परतीचा पाऊस पडत आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना या परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासांत विभागात सरासरी 14 मि.मी. पाऊस झाला आहे. विभागात सर्वाधिक पाऊस धाराशिव जिल्ह्यात झाला आहे. या जिल्ह्यात 36 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये कळंब-66, शिराढोण-70, वाशी-82, तेरखेडा-82, पारगाव-70, परंडा-80 आणि आशू मंडळात 65 मि.मी. पाऊस झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या अन्य मंडळांत नांदेड जिल्ह्यात देगलूर-96, खानापूर-81, शहापूर-72, मिरखेल मंडळात 89 मि.मी. पाऊस झाला. बीड जिल्ह्यात ममदापूर-85, हनुमंत पिंपरी- 65 मिमी. तसेच लातूर जिल्ह्यातील तांदुळजा मंडळात 170 मि.मी. आणि चिंचोली येथे 112 मि.मी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस धाराशिव येथे सरासरी 36 मि.मी. पाऊस झाला आहे. या जिल्ह्यापाठोपाठ लातूरमध्ये 26.47 मि.मी. पाऊस झाला असून अन्य जिल्ह्यांत नांदेड-11.35 आणि बीड जिल्ह्यात 22.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

वार्षिक सरासरी 77.39 टक्के
संभाजीनगर विभागाचे सरासरी पर्जन्यमान 779.00 मि.मी. असून आजमितीला या विभागात 753.87 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तेवढा पाऊस झालेला नाही. परतीच्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे. विभागात आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 602.83 मि.मी. असून पडलेल्या पावसाची एकूण टक्केवारी 79.96 टक्के आहे. वार्षिक सरासरी ही 77.39 टक्के आहे. परतीचा पाऊस हा भविष्यातील टंचाई निवारणास मदत करणारा आहे, असे मानले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या