करळफाटा ते उरणफाटा सहा तास अवजड वाहनांना बंदी

उरण तालुक्यातील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी उरण तालुक्यातील करळफाटा ते नवी मुंबई येथील मुंबई-पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उरणफाट्यापर्यंत सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीस बंदी करण्यात आल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली आहे.

अवजड कंटेनर ट्रेलर वाहनांना करण्यात आलेल्या वाहतूक बंदीच्या वेळेत करळफाटा ते उरणफाटा दरम्यानच्या बेलापूर, उलवा, गव्हाणफाटा, शंकर मंदीर, जासई व दास्तानफाटा यापैकी कोणत्याही ठिकाणी अवजड कंटेनर ट्रेलर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नलावडे यांनी दिला आहे. नुकताच उरण युवातर्फे 9 ऑक्टोंबर रोजी वाहतूक कोंडी विरोधात आक्रोश जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीला वैतागलेल्या उरण वासीयांच्या प्रवास सुखकर करण्यासाठी करळफाटा ते उरणफाटा दरम्यानच्या महामार्गावर अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीस सहा तास बंदी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या