अवजड वाहनांच्या निर्बंधांचा उद्योगांना फटका; पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती

औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात विविध कंपन्यांसाठी कच्च्या मालाची आयात-निर्यात करण्यासाठी अवजड वाहनांचा मोठा वापर केला जात असतानाच या अवजड वाहनांसाठी पोलिसांनी वाहतूककोंडीचे कारण देऊन निर्बंध घातले आहेत. दिवसभरात केवळ चार तासच जड वाहनांना प्रवेश दिला जात आहे. याचा फटका उद्योजकांना बसत असून, शहर हद्दीबाहेर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरालगत भोसरी, चिंचवड, तळेगाव दाभाडे, चाकण, महाळुंगे, रांजणगाव अशा प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी असणाऱ्या हजारो कंपन्यांमध्ये कच्चा माल आणणे आणि तयार झालेला माल नेण्यासाठी रस्तामार्गे वाहतूक केली जाते. एमआयडीसीमधून तळेगाव दाभाडेमार्गे मुंबई बंदरातून येथील उत्पादने जगभरात पोहोचविली जातात. ट्रक, कंटेनरद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर पुरवठा साखळी अवलंबून आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी एमआयडीसीकडे जाणाऱ्या वाहतकीच्या वेळेत कपात करून पुरवठा साखळीवर आघात केल्याचा आरोप उद्योजकांकडून केला जाऊ लागला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तळवडे, निगडी, चिंचवड, भोसरी, सांगवी, वाकड, बावधन, पिंपरी, देहू रोड, महाळुंगे, चाकण, दिघी, आळंदी, भोसरी, तळेगाव परिसरात जड व अवजड वाहनांना दिवसभरात केवळ चार तास प्रवेश असणार आहे. औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असलेल्या शहर परिसरात जड-अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या बाजूला दररोज काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्ग आणि औद्योगिक वसाहतींमधील प्रमुख मार्गांवर अवजड वाहने थांबवून कोंडी केली जात आहे.

पुणे-मुंबई महामार्गाने निगडीच्या दिशेने येणारी अवजड वाहने भक्ती शक्ती चौकातून त्रिवेणीनगरमार्गे तळवडे, स्पाइन रोडमार्गे भोसरी, चिंचवड एमआयडीसीमध्ये जातात. औद्योगिक वसाहतींमधील वाहतूक सुलभहोण्यासाठी स्पाइन रोडची निर्मिती झाली. तेथेच या वाहनांना बंदी घातली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून रावेत एक्झिटवरून मुकाई चौकात जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हा मार्ग नाशिक रोडला जोडण्यासाठी बनविला आहे. या प्रमुख मार्गांसह एकूण ६२ मार्गांवर वेगवेगळे निर्बंध घालण्यात आले आहेत.

अनेक महिन्यांपासून ‘ट्रक टर्मिनल्स ‘चे काम सुरू
तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात दोन ‘ट्रक टर्मिनल्स’ उभारली जात आहेत. पुष्पसंवर्धन केंद्रालगत १० हजार चौरस मीटर परिसरात उभारल्या जात असलेल्या टर्मिनलची क्षमता २०० ट्रक एवढी आहे, तर बधालेवाडी-मिंडेवाडी येथे ४० हजार चौरस मीटर परिसरात उभारल्या जात असलेल्या टर्मिनलची क्षमता ३५० ट्रक एवढी आहे. या दोन्ही टर्मिनल्सचे काम २०२३मध्ये सुरू झाले आहे. ते अद्यापि पूर्णत्वास आले नाही.

दिवसा अवजड वाहतुकीवर बंधने घातल्याने साहित्य दिवसा पाठविण्यासाठी वेळ लागेल. अवजड वाहतूक थांबवत असताना त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनल विकसित करावे. त्या ठिकाणी चालकांना स्वच्छतागृह, जेवणाची व्यवस्था, सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच शहरातील विविध चौकांत खासगी बसथांबे आहेत. त्यांच्याकडून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असताना उद्योजकांना त्रास देण्यासाठी विविध निर्बंध घातले जात आहेत. नियम सर्वांना सारखे असावेत.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

चाकण एमआयडीसीमध्ये ५० ते ६० वाहने बसतील एवढे टर्मिनल आहे. रस्त्यावर हजारो वाहने उभी असतात. त्यामुळे हे टर्मिनल अपुरे पडत आहे. किमान ५०० अवजड वाहने पार्क होतील एवढ्या क्षमतेचे टर्मिनल असणे आवश्यक आहे. वाहतूक थांबली तर वेळेत माल पोहोचणार नाही. त्याचा उद्योगावर परिणाम होईल.
– दिलीप बटवाल, सीईओ, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

नवीन ट्रक टर्मिनलची आवश्यकता
एमआयडीसी परिसरात सुमारे ५०० अवजड वाहने पार्क करता येतील एवढ्या मोठ्या क्षमतेच्या ट्रक टर्मिनलची आवश्यकता आहे. येलवाडीजवळ ५५ एकर जागेत प्रशस्त ट्रक टर्मिनल बनविण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले. मात्र, अद्यापि त्यावर कोणतीही हालचाल झाली नाही. सध्या एमआयडीसी परिसरात एफ टू ब्लॉक, टी ब्लॉक आणि भोसरी येथे अशी तीन ट्रक टर्मिनल्स विकसित करावीत.